Cart

Your cart is currently empty.

Sub Total: $0.00

शास्त्र 

  • Home
  • शास्त्र 

शास्त्र 

‘अरे/अगं! शास्त्र असतं ते!’ असं आई पटकन म्हणून जाते, जेव्हा मुलगी/मुलगा विचारतात की नैवेद्याचं पान वाढताना भाजी उजवीकडेच का वाढायची किंवा लिंबू, कोशिंबीर वगैरे डावीकडेच का वाढायचं ? घरातील कोणी बुजुर्ग व्यक्तीने पटकन म्हणलेलं हे वाक्य कधी ना कधी तरी आपल्या कानावर येतंच. शाळेत विज्ञानामध्ये किंवा भूगोलामध्ये शास्त्रीय कारणे लिहा (आजच्या मुलांच्या भाषेत ‘Give Scientific Reasons’)  हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेली घोकंपट्टी अनेकांना नक्कीच आठवत असेल! ‘आमच्या इथे शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती मिळतील’ हा नजरेस पडणारा फलक किंवा शास्त्रीय संगीत आणि नृत्यवर्गांच्या दृष्टीस पडणाऱ्या जाहिराती हा सामान्यपणे शास्त्रशब्दाशी येणारा आपला संबंध!

पण मग हे ‘शास्त्र’ म्हणजे नक्की आहे तरी काय ? आयुष्य जगताना माणसाला अनेक गोष्टींची गरज भासते आणि त्या ओघात मग माणूस अनेक गोष्टी करून पाहतो, शिकतो, आत्मसात करतो, योग्य आणि अयोग्य काय, उपयोगी काय हे ठरवतो. या माणसाच्या ज्ञानप्राप्तीच्या प्रवासातूनच शास्त्र उदयास येते. शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा सर्व बाजूंनी केलेला, योग्य प्रकारे मांडलेला आणि तपासून पाहून ज्याची निर्दोषता आणि परिपूर्णता सिद्ध झाली आहे असा विचार. शास्त्र म्हणजे ‘पद्धति’. शास्त्र ही गोष्टींमधल्या किंवा घटनांमधल्या कार्यकारणभावाचा (cause effect relationship) विचार करतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘कशासाठी’, ‘का’, ‘कसं’, ‘कशाच्या मदतीने’, ‘कशामुळे’ या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शास्त्र आपल्याला देतं.

आजच्या समजुतीप्रमाणे आपण ज्याला विज्ञान म्हणतो ते विज्ञान हा शास्त्रामधील एक भाग असून, भारतीय शास्त्रांची व्याप्ती नक्कीच त्याहून मोठी आहे. शास्त्र आपल्याला गोष्टींमागची कारणमीमांसा (ज्याला आपण आजच्या भाषेत ‘थिअरी’ म्हणतो) आणि त्या प्रत्यक्षात कश्या आणाव्यात (ज्याला आपण आज ‘प्रॅक्टिकल’ किंवा ‘अप्लाइड साईड’ असं म्हणतो) या दोनही बाबतींत मार्गदर्शन करतं. प्रत्येक व्यक्तीसाठी तिच्या परिस्थितीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे वेगळा विचार करण्याचा सुज्ञपणा किंवा जाणीव (अगदी साधं उदाहरण म्हणजे प्रत्येक रुग्णाची प्रकृती, त्याचे वय, तो राहतो त्या भौगोलिक प्रदेशाची वैशिष्ट्ये जसे हवामान, त्याचा व्यवसाय, इत्यादींचा विचार करूनच वेगळी चिकित्सा देणे) आणि त्याचवेळी नियम आणि सिद्धांत मांडून सार्वत्रिकता (universality) प्रस्थापित करण्याची शक्ती (उदाहरण द्यायचे झाले तर पाणिनीने व्याकरणामध्ये मांडलेले शब्दांचे प्रत्यय (suffixes or specific structure of a word) जे कोणत्याही संस्कृत शब्दाचे रूप बनवताना चपखल लागू होतात) ही दोन्ही वैशिष्ट्ये यातच भारतीय शास्त्रांचे सौंदर्य दडलेले आहे. आणखी एक सांगण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय शास्त्रे एखाद्या गोष्टीचा समग्रपणे म्हणजेच सर्व बाजूंनी, सर्व अंगांनी (holistically) विचार करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय यज्ञसंस्था, ज्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांना काम मिळेल आणि पर्यावरणाचेही कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही.

परंपरा आणि रूढी यांचा शास्त्राशी अगदी जवळचा संबंध आहे. किंबहुना यामधूनच शास्त्र घडत जाते. शास्त्र तयार होणे ही ज्ञान होण्याच्या प्रक्रियेतील अगदी शेवटची आणि उच्चतम पायरी आहे. परंपरा आणि रूढी यांची शास्त्र टिकवण्यामध्येही महत्वाची भूमिका असते बरं. कारण शास्त्राशी रोजच्या आयुष्यात सामान्य लोकांचा संबंध येतोच असे नाही, पण तो परंपरांशी आणि रूढींशी मात्र येतो. पण जेव्हा मार्ग सापडत नाही किंवा परंपरांची आणि रूढींची उपयोगिता आणि सत्यता पडताळून पाहण्याची वेळ येते किंवा त्यात बदल करण्याची वेळ येते तेव्हा शास्त्रच माणसाला मदत करतात. परंपरा म्हणजे एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला वारसा, गुरूने शिष्याला शिकवलेले ज्ञान जे पुढे पुढे जात राहते. रूढी म्हणजे पद्धती किंवा ritual जी परंपरा कशी टिकवायची हे सांगते. म्हणजे एखाद्या घरातला वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा करण्याचा ठरलेला रिवाज ही झाली परंपरा आणि ती ठराविक पद्धतीने करायची (जसे केळीचे खांब लावायचे किंवा शिरा अमुक तमुक पद्धतीने करायचा वगैरे वगैरे) ही झाली रूढी. ठराविक दिवशी उपास करावा ही परंपरा जी वर्षानुवर्षे चालत येते आणि त्यादिवशी काही पदार्थ खायचे आणि काही खायचे नाहीत ही आपली समजूत म्हणजे रूढी. पण आता हा उपास का बरं करायचा ? तर तो फक्त आपल्या आहारातला बदल नसून आपल्या विचारात सुद्धा बदल व्हावा किंवा आपल्या पचनशक्तीला आराम  मिळावा हे त्यामागचे शास्त्र होय.

एखादी पद्धती शास्त्र म्हणून ओळखली जाण्यासाठी त्यात नक्की काय बरं असले पाहिजे? शास्त्र आपल्याला जगात किंवा त्यापलीकडे काहीतरी आहे हे अधिष्ठान (Stability/Base) देतात. काहीतरी आहे हे मानल्याशिवाय पुढे कोणतीच क्रिया करता येत नाही किंवा पुढचे ज्ञान होऊ शकत नाही, त्यामुळेच आपण गणितात बेरीज, वजाबाकी या मूळ क्रियांचा आधार घेऊनच पुढच्या क्रियांचा अभ्यास करतो.

शास्त्रे योग्य काय ते सांगतात किंवा काय केल्यावर अपेक्षित परिणाम साधता येईल हे सांगतात. तसेच शास्त्रे ही कृतीसाध्य असतात, म्हणजे मानवी प्रयत्नांनी साध्य असतात. कार्य करण्याचा योग्य क्रम, ते कार्य होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, त्यांचे प्रमाण इत्यादी मार्गदर्शन शास्त्रे करतात कारण त्याशिवाय अपेक्षित परिणाम साधत नाही. म्हणजेच शास्त्र हे वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखाद्या गोष्टीमागचे कारण सांगते आणि ते तर्कशुद्ध (logical) आणि इष्ट (beneficial for everyone)  सुद्धा असते त्याचवेळी त्याला शास्त्राचे स्थान प्राप्त होते. पण परंपरा किंवा रूढी प्रत्येक वेळी तर्कशुद्ध आणि इष्ट असतीलच असे नाही. म्हणूनच शास्त्राचे स्थान हे सर्वोच्च मानले जाते.

शास्त्रे दोन प्रकारची आहेत – (१) लौकिक पदार्थांची कार्ये आणि त्यांची कारणे याबद्दल विचार करणारी शास्त्रे पहिल्या प्रकारात मोडतील. लौकिक (इह) पदार्थ म्हणजे जगात अस्तित्त्वात असणारे किंवा आपल्या इंद्रियांनी जाणून घेता येणारे पदार्थ (Tangibles). जसे आयुर्वेद, ज्यामध्ये आपल्या शरीराचा मनाचा, आयुष्याचा आणि आयुष्याशी जोडल्या गेलेल्या इतर अनेक गोष्टींचा विचार आहे. या प्रकारामध्ये स्थापत्यशास्त्र, धनुर्वेद, नाट्यशास्त्र, भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, रसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इत्यादि अशी अनेक शास्त्रे मोडतात. (२) दुसऱ्या प्रकारच्या शास्त्रांमध्ये पारलौकिक (पर) गोष्टींबद्दल विचार दिसतो. पारलौकिक म्हणजे काय ? तर ज्या गोष्टी माणूसपणाच्या मर्यादा (इह) ओलांडल्याशिवाय आपण समजून घेऊ शकत नाही अश्या गोष्टी – जसे ईश्वर म्हणजे नक्की काय किंवा आत्म्याचे स्वरूप काय, इत्यादि. याबद्दल वर्णन करणारी शास्त्रे दुसऱ्या प्रकारात मोडतात. ही शास्त्रे मांडणारा शास्त्रकार सुद्धा तितकाच अधिकारी व्यक्ती असावा लागतो. (ही अधिकारी व्यक्ती म्हणजे अगदी कोणीही असू शकते, त्याला कोणतेच सामाजिक, आर्थिक किंवा शैक्षणिक, इत्यादी बंधने असत नाहीत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे उपनिषदामध्ये रैक्व नावाच्या बैलगाडी चालवणाऱ्या सामान्य माणसाने राजाला संपूर्ण ज्ञानाचा उपदेश केल्याची कथा दिसते.) वेदान्तशास्त्र, सर्व भारतीय आस्तिक दर्शने (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा) दुसऱ्या प्रकारात मोडतात.

खरंतर प्रत्येक शास्त्रात लौकिक आणि पारलौकिक या दोन्ही गोष्टींचा विचार दिसतो, पण त्यात प्रामुख्याने ज्याचा विचार आहे त्यानुसार त्याची विभागणी केली आहे. जसे योगशास्त्रात परमात्म्याची ओळख याचा फक्त विचार न करता आपल्याला शरीराने आणि मनाने साधायची आसने, प्राणायाम याबद्दलही योगशास्त्र सांगतेच.

तर अशा प्रकारे आपण शास्त्रांची ओळख करून घेतली. आता याबद्दल अधिक विस्ताराने पुढील शृंखलेत पाहूच!

Tags:
Share Article:

Rujuta Vaidya

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Useful Links:

©2025, Earth All Rights Reserved.| Design & Developed By Akhand Solutions.