प्रत्येक समाजाचा आत्मा म्हणजे त्या समाजाची भाषा. समाज आहे म्हणजे त्याला भाषा आहे. कारण समाज अखंड संवाद करत असतो. याच संवादातून ज्ञानाची निर्मिती होत जाते आणि ते ज्ञान भाषेद्वारे जतन होते. शिवाय ते प्रवाही ठेवण्याचे कामही ही भाषाच करते.
या दृष्टिने विचार केला तर संस्कृत भाषेचे किती अनन्य साधारण महत्व आहे हे लगेच कळून येईल कारण जवळपास ४००० वर्षे या भाषेने ज्ञानाचे जतन केले आहे आणि त्याला प्रवाही ठेवले आहे. या शिवाय भारतीय समाजाची सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक जडणघडण याचे पडसाद संस्कृत भाषेवर खोलवर उमटलेले दिसतात. शिवाय संस्कृत साहित्यात त्याचे चित्रणही आपल्याला दिसते.
साहित्याबरोबरच अजुनी प्रचंड मोठा ज्ञानाचा साठा संस्कृत मधे आहे जो अजुनही पूर्णत: प्रकाशात आलेला नाही. विविध क्षेत्रातील संशोधक आणि विद्वानांना आज संस्कृत भाषेमध्ये रूची निर्माण होते आहे परंतु अजुनही अनेक जण असे आहेत जे या वारस्याविषयी अनभिज्ञ आहेत. संस्कृत चे विद्यार्थी म्हणून हे ज्ञान सर्वांपुढे ठेवण्याची तीव्र गरज आम्हाला जाणवते.
कोणताही अभ्यास करताना त्या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली जाते. आजही अनेक विषयांसाठी ती पार्श्वभूमी वेदांपासून सुरू होते. शेती, पशुपालन, युद्धशास्त्र या विषयांची सुरूवात आपल्याला वेदांपासून करावी लागते. आज ज्या शांततेसाठी वैश्विक स्तरावर प्रयत्न चालु आहेत त्याची एक प्रगल्भ कल्पना आपल्याला वेदात आढळून येईल. हेनिज किंवा आईन्सटाईन ने ज्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्या काॅस्मिक कोड चा विचार ऋग्वेदातही करण्याचा प्रयत्न झाला आहे.
वैदिक कालातल्या जिज्ञासेचे आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. नासदीय सुक्तामध्ये सृष्टीच्या निर्मितीविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. आपल्या आजुबाजुला दिसणा-या जगाचा आवाका काय आहे या संबंधी वैदिक लोक अभ्यास करताना दिसतात. ऋग्वेद आणि अथर्ववेदातील या प्रश्नांवर आजही संशोधन चालते.
वेदांना हजारो वर्ष शुद्ध स्वरुपात टिकवणारी अचूक मौखिक पद्धत हे या परंपरेचे वैशिष्ट्य आहे. भाषेची रचना, वर्णावर, त्याच्या उच्चारणावर केलेला सखोल विचार ही सगळी वैशिष्ट्ये भाषाशास्त्रीय दृष्टीने संस्कृत भाषा किती प्रगत आहे हे सिद्ध करतात. प्रातिशाख्यांमध्ये वर्णाच्या उच्चारणाचे प्रयत्न व उच्चारस्थान यांचा आजच्या प्रगत उच्चारणशास्त्राच्या (phonology)च्या दृष्टीने विचार झालेला आहे.
भारताला वाद, चर्चा आणि संवादाची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. याच बरोबर संस्कृत भाषेने एक फार मोठी तर्काची आणि तत्वज्ञानाची परंपराही जपली आहे. धर्म म्हणजे नक्की काय? मुक्ती म्हणजे काय? सत्य किंवा अंतिम सत्य असे काही आहे का? माणसाचे या पृथ्वीवर असण्याचे प्रयोजन काय? माणसाला माणसाशी जोडणारा एखादा शाश्वत दुवा असु शकतो का? असे अनेक प्रश्न आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आपल्या सर्वांना पडतात. आरण्यक-उपनिषदांमध्ये या प्रश्नांचा उहापोह झालेला दिसतो. तत्त्वज्ञानाचे परिपूर्ण असे संवाद हे ‘Philosophy was born in dialogues’ या उक्तीचे जणू निर्देशक आहेत.
कणादांच्या वैशेषिकात गुरूत्वाकर्षण, सापेक्षता या विषयांवरची सुत्रे आढळतात. त्याच बरोबर आर्युवेद, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता अशा ग्रंथामधली प्रचंड ज्ञानसंपदा हा आजच्या काळातही संशोधनाचा विषय आहे.
संस्कृत भाषेचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे ही भाषा प्रकृति-प्रत्यय प्रधान आहे, प्रत्ययांची अचुकता व स्पष्टपणा यामुळे क्रमाला महत्व नसूनही तो अर्थ प्रतिपादित करण्याच्या क्षमतेमुळे एकच वाक्य अनेक पद्धतींनी बोलू शकतो.
उदाहरणार्थ: देवदत्त: काष्ठै: स्थाल्याम् ओदनं पचति।’ हे वाक्य तुम्ही किती पद्धतीने लिहू शकता आणि तेही अर्थात बदल न होता? मला वाटतं आपण कोणीही याचे उत्तर एक किंवा दोन वेळा असं देऊ. मात्र संस्कृत भाषेचा अभ्यासक याचं उत्तर देईल चक्क १२० वेळा. म्हणजे ‘काष्ठै: देवदत्त: स्थाल्याम् ओदनं पचति।’, ‘देवदत्त: स्थाल्याम् ओदनं काष्ठै: पचति।’ अशा कोणत्याही प्रकारे हे वाक्य लिहले तरी याचा अर्थ ‘देवदत्त काठ्यांच्या सहाय्याने अन्न शिजवतो’ असाच राहतो.
मॅक्स म्युलर म्हणतो, The discovery of Sanskrit language, is the greatest discovery of 20th century. पाश्चात्य जगाला या भाषेचे वेड लागण्याची अनेक कारणे होती.Hemingway ची Concise and precise ही विश्वामध्ये स्तुत्य व आदर्श ठरलेली पद्धत अष्टाध्यायी, मीमांसा सूत्रे यांसारख्या ग्रंथांनी हजारो वर्ष आधीच रुजवलेली आहे. शून्याचा आर्यभट्टांनी लावलेला शोध, लीलावती हा भास्कराचार्यांचा गणितशास्त्रावरील उत्कृष्ट ग्रंथ आणि आपण आज पायथागोरस प्रमेयाच्या नावाने जो सिद्धांत ओळखतो त्या सिद्धाताचा शुल्ब सूत्रांमध्ये उल्लेख ही पुरातन उपलब्ध असलेल्या संस्कृतामधील गणिताची वैशिष्ट्ये आहेत.
व्याकरण कर्ता पाणिनीच्या कार्याला ब्लुमफिल्ड ने मानवी बुद्धिमत्तेचे सर्वोच्च स्मारक म्हणुन गौरवले. भास, कालिदासाच्या नाटकांनी वाङ्मयीन जगामध्ये अढळ स्थान प्राप्त केले आहे. भगवद्गीतेचे गारूड संपूर्ण जगावर आहे. एक्सिजिसीस च्या अंदाजानुसार भगवद्गीता हे सर्वात जास्त भाषांतरीत केले गेलेले आशियाई पुस्तक आहे. त्याचप्रमाणे २००१ मध्ये तयार झालेल्या एका सुचीनुसार वेदांवर जगात एकुण ४४००० पुस्तके लिहिण्यात आली.
यज्ञपरंपरा हे संस्कृत ने जपलेले एक रहस्य आहे. या परंपरेचे जितके पैलु उलगडत जाऊ तितके आपल्याला आपल्या पूर्वजांच्या जवळ जाता येते. रामायण-महाभारतातील एक एक व्यक्तिरेखा आजही भारतीयांच्या मनांत घर करून आहेत. पुराणांत प्रतिकात्मकतेचे अनेक पदर आपल्याला दिसतात. स्मृतींनीही वेळोवेळी बदलत गेलेला भारत जतन करून ठेवला आहे.
यावरून आपल्या लक्षात येईल की संस्कृत भाषा आणि त्यातले वाङ्मय यांच्याकडे सगळे जग आदराने आणि तेवढेच कुतुहलाने बघते. मात्र प्रश्न हा आहे की आज आपण एक भारतीय म्हणुन या ज्ञानपरंपरेकडे कसे पाहतो? एकतर या ज्ञानपरंपरेची काहीही माहिती न घेता याला टाकाऊ ठरवले जाते नाहीतर याविषयी पोकळ बढाया मारल्या जातात. मात्र आज गरज आहे ती हा उज्ज्वल वारसा डोळसपणे जाणून घेण्याची आणि चांगलं भविष्य घडविण्याचा तोच एकमेव मार्ग आहे असं आम्हाला वाटतं.
संस्कृत भाषा ही फक्त एक भाषा नसून त्यातील वाङ्मय आणि त्यायोगे मिळणारे ज्ञान हे जगण्याची एक परिपूर्ण पद्धतीच सांगते असे आपण निश्चितच म्हणू शकतो. संस्कृत भाषेचे विद्यार्थी म्हणून या भाषेने जतन केलेल्या ज्ञानामधील काही शास्त्रांविषयी आम्ही ही लेखमाला प्रसिद्ध करणार आहोत, ज्यात दर महिन्याला एक लेख प्रसिद्ध होईल, जेणेकरून सर्वांनाच भारतीय ज्ञानपरंपरेकडे पाहण्याची एक नवी दृष्टी प्राप्त होईल. ही लेखमाला नियमित वाचा आणि तुमचे अभिप्राय नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा.