अलीकडच्या काळात एखाद्या शहरात किंवा गावात झाडे तोडली गेली की समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळते. पर्यावरणप्रेमी संघटना, सुजाण नागरिक रस्त्यावर उतरतात, आंदोलने होतात, निवेदने दिली जातात, प्रसंगी न्यायालयीन लढा देखील उभा राहतो. हे सर्व आवश्यक आहेच, कारण झाडे म्हणजे केवळ लाकूड नव्हे, ती आपल्याला श्वास देणारी, तापमान नियंत्रित ठेवणारी आणि जैवविविधतेला आधार देणारी जीवनव्यवस्था आहे.
विश्व पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने एक प्रश्न मात्र आपण स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. पर्यावरणाची चिंता व्यक्त करताना आपण आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणासाठी किती जबाबदारीने वागतो? दिवसातील किती वेळ आपण पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारण्यासाठी वापरतो?
देशभरात रस्ते, मेट्रो, रेल्वे, विमानतळ, नदीकाठ विकास प्रकल्प, गृहनिर्माण योजना आणि इतर अनेक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांचा हस्ते पर-हस्ते लाभ संपूर्ण समाजाला मिळतो आहे. या प्रकल्पांमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते. काही प्रकल्प खरोखर आवश्यक असतात, तर काहीं प्रकल्पांवर किंवा त्याच्या राबवण्याच्या प्रक्रियेवर वाद असू शकतात. विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोल कसा साधायचा, यावर चर्चा – मतभेद होणे स्वाभाविक आहे आणि त्यातून पर्यावरणासाठी कमीत कमी हानी करणारे समाज उपयोगी प्रकल्प उभे राहावेत ही सगळ्यांचीच अपेक्षा असते.
पर्यावरणाचा प्रश्न फक्त झाडतोडीपुरता मर्यादित नाही. खरं तर पर्यावरणाची हानी आपल्या रोजच्या सवयींमधून अधिक वेगाने होत असते. एका बाजूला आपण झाडतोडीविरोधात आवाज उठवतो आणि दुसऱ्या बाजूला कागद, लाकूड, प्लास्टिकचा बेफाम वापर करतो, विजेचा अपव्यय करतो, गरज नसलेल्या वस्तू खरेदी करतो, कचरा रस्त्यावर फेकतो आणि संसाधनांचा अविचाराने वापर करतो. अशा वेळी आपला पर्यावरणवाद अपुरा ठरतो.
आज पर्यावरण वाचवायचे असेल, तर केवळ वृक्षारोपण नव्हे तर पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण पूरक जीवनशैली निवडणे आणि राबवणे हे सुरुवातीला वेळ घेणारे काम वाटू शकते, परंतु एकदा त्याची सवय झाली की हेच बदल पर्यावरण, स्वास्थ्य, आणि घरातील आर्थिक बचतीच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे आपल्याला जाणवू लागते.
पर्यावरण संरक्षणासाठी मोठमोठ्या घोषणांपेक्षा छोट्या कृती अधिक प्रभावी ठरतात. आपण दररोज निर्माण करणारा कचरा, वापरणारी वीज, खर्च होणारे पाणी आणि आवश्यकता नसताना खरेदी होत असलेल्या वस्तू यांचा थेट संबंध पर्यावरणाशी असतो. आपल्या घरात ‘इको-फ्रेंडली’ या नावाखाली आलेल्या स्टीलच्या/ काचेच्या बाटल्या, कागदाच्या पिशव्या, कापडी पिशव्या याचाही मग अतिरेक व्हायला सुरुवात होतो!
भारतातील शहरांमध्ये दररोज हजारो टन कचरा निर्माण होतो. त्यातील मोठा भाग डम्पिंग ग्राऊंडवर जातो. कचऱ्याचे डोंगर वाढतात, भूजल दूषित होते, मिथेनसारखे हरितगृह वायू निर्माण होतात आणि आसपासच्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.
विश्व पर्यावरण दिवसापासून आपण आपल्या घरातील कचरा जाणून घेणे, त्याचे सर्वेक्षण करणे, कोणता कचरा कमी करता येईल यावर विचार करणे, ओला, सुका, घातक आणि घरातून निघणारा सॅनिटरी कचरा (सॅनिटरी पॅड, अडल्ट डायपर, चाइल्ड डायपर) वेगळा करायला सुरुवात करून आणि त्यावर रोज 10 मिनिटे वेळ देणे असा संकल्प घेऊ शकतो का? घरातच ओला कचऱ्यापासून खत तयार केले आणि प्लास्टिकचा वापर कमी केला, घरात आलेले प्लास्टिक स्वच्छ करून वेगळे ठेवले आणि योग्य रिसायकलर कडे पोहोचवले तर पर्यावरणावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. पर्यावरणासाठी हा हातभार कोणत्याही आंदोलनापेक्षा कमी महत्त्वाचा नाही.
सध्याची ग्राहक संस्कृती “वापरा आणि फेकून द्या” या तत्त्वावर आधारित आहे. ‘ए टच अवे’ या ऑनलाइन खरेदी संस्कृती मुळे नवे कपडे, नवी गॅझेट्स, नवे फर्निचर, नवे सजावटी साहित्य – सतत काहीतरी नवीन खरेदी करण्याची मानसिकता तयार झाली आहे.
मात्र प्रत्येक वस्तूच्या मागे पाणी, ऊर्जा, खनिजे, वाहतूक आणि औद्योगिक उत्पादनाची मोठी साखळी असते. आपण अनावश्यक वस्तू खरेदी करतो तेव्हा प्रत्यक्षात नैसर्गिक संसाधनांवर अतिरिक्त ताण निर्माण करत असतो याचा आपल्याला पत्ताच नसतो.
पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे दारिद्र्य नव्हे; ती सजगता आहे. एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी “खरोखर गरज आहे का?” हा प्रश्न विचारणे ही पर्यावरणासाठीची पहिली पायरी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी या वर्षी आपण अनावश्यक खरेदीवर ताबा ठेवू शकतो का?
आपल्यापैकी अनेकांना वाटते की पर्यावरण आणि विजेचा काही संबंध नाही, आणि मजेची गोष्ट म्हणजे अनेकांना असेही वाटते की ‘पेपर-लेस’ कारभार हा पूर्णतः पर्यावरण पूरक आहे! पण भारतात मोठ्या प्रमाणातील वीज अजूनही कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्पांमधून तयार होते. जरी काही प्रमाणातील ऊर्जा सौर/ पवन/ लाटा यापासून निर्माण होत असली तरीही अशी ऊर्जा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी संसाधने जसे की पवनचक्कीचे अवयव मधला खांब, पंखे सोलर पॅनल साठीचे साहित्य इत्यादी पर्यावरणाची हानी करूनच प्राप्त होतात.
घरातील अनावश्यक दिवे, एसी, पंखे आणि उपकरणे चालू ठेवणे, एसी 16-180C तपमानावर ठेवणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अधिक कोळसा जाळण्यास हातभार लावणे होय. वास्तवात हालचाल झाल्यावर आपोआप सुरू-बंद होणार्या दिव्यांचा शोध लागलेला असताना देखील बहुतांश शहरांमध्ये सरसकट सगळ्या कंपन्या, इमारती, मॉल्स यामध्ये रात्रीच्या वेळीसुद्धा दिवे/ एसी चालूच ठेवण्याचा प्रघात दिसतो. हे थांबवायला हवे.
एलईडी दिवे वापरणे, जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग करणे, ऊर्जा कार्यक्षम उपकरणे निवडणे आणि सौरऊर्जेकडे वळणे या छोट्या कृतींचा एकत्रित परिणाम अत्यंत मोठा असतो. आज पासूनच घरातून, ऑफिस मधून, शाळेतून किंवा सोसायटी मधून बाहेर पडताना अनावश्यक उपकरणे आपण बंद करायला सुरुवात करूया.
महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांना वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागतो. तरीही शहरांमध्ये पाण्याचा अपव्यय सुरूच असतो. पाण्याच्या संदर्भातील आपला निष्काळजीपणा शिगेला पोहोचला आहे असे म्हणण्यास भाग पडते. सकाळी उठल्या क्षणापासून ते झोपेपर्यंत आपण सतत पाण्याचे प्रदूषण करत राहतो टूथपेस्ट, साबण, शॅम्पो, कॉस्मेटिक्स, वेग – वेगळ्या प्रकारचे डिटर्जेंट्स, क्लीनर्स सतत पाण्यात सोडत राहतो आणि मग स्वच्छ पाणी मिळत नाही म्हणून सरकार ला दुषणे देतो!
गाडी धुण्यासाठी, अंगण धुण्यासाठी किंवा गळतीच्या नळांकडे दुर्लक्ष करून आपण अमूल्य पाणी वाया घालवत असतो. प्रत्यक्ष वापरात येणार्या पाण्याचा हिशोब ठेवायला आपण सुरुवात केली की मग अप्रत्यक्ष पाण्याचा वापर कमी करण्याकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. उदाहरण द्यायचे झाले तर एक किलो वापर योग्य सुती कापड तयार करण्यासाठी कापूस पीक घेण्यापासून लागणारे पाणी विचारात घेतले तर साधारणतः 22000 लिटर पाणी लागते!! आता आपले जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले पाणी जर आपल्या कपड्यांवर, ईमेल पाठवण्यावर, गाड्या-घोड्या वर खर्च केले तर पाणी टंचाई साठी जबाबदार कोण?
पावसाचे पाणी साठवणे, पुनर्वापर करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही केवळ बचतीची नव्हे तर पर्यावरणीय जबाबदारीची बाब आहे. त्यामुळे घर घरातून पाण्यात मिसळले जाणारे विषारी पदार्थ टाळून त्याऐवजी घरीच बनवलेल्या बायो-एंझाइम चा वापर आपण वाढवू शकतो का याचा या वर्षी प्रयत्न करूया.
अनेकदा पर्यावरणाचा प्रश्न केवळ एखाद्या प्रकल्पाला विरोध करण्यापुरता मर्यादित राहतो. पण खरा पर्यावरणवाद हा आपल्या जीवनपद्धतीतून दिसला पाहिजे. आपल्या प्रत्येकाचे घर पर्यावरण पूरक झाले, आपल्या कचऱ्याची जबाबदारी आपण घेतली आणि बेफिकिरी ने तो पिशवीत बांधून रस्त्याच्या कडेला किंवा नदीत टाकणे बंद केले, छोट्या अंतरासाठी चालत जाण्याचा सराव केला, वस्तू खरेदीवर नियंत्रण ठेवले तरच पर्यावरणाचा र्हास थांबवण्यात आपल्याला यश येण्याची शक्यता आहे.
आपण प्लास्टिकच्या पिशव्या वापरत असू, अन्न वाया घालवत असू, गरज नसताना वातानुकूलन यंत्रे चालवत असू, पाण्याचा अपव्यय करत असू आणि सतत अनावश्यक वस्तू खरेदी करत असू, तर फक्त झाडतोडीविरोधात आवाज उठवून पर्यावरण वाचणार नाही.
पर्यावरण संवर्धन ही एक सवय आहे, एक संस्कार आहे आणि एक जीवनमूल्य आहे, पण खरे पाहता ती अनिवार्य गरज आहे. पर्यावरणाचे संवर्धन करून आपण पर्यावरणावर उपकार करत नसून स्वतःच्या आणि येणाऱ्या पिढीच्या शाश्वत विकासाची आणि जीवनाची तरतूद करत आहोत. त्यामुळे कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी वर उहापोह केलेल्या चूकीच्या सवयींचा त्याग आणि पर्यावरणपुरक सवयींचा अंगीकार करणे हे मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी आंदोलने, घोषणाबाजी किंवा सोशल मीडियावरील पोस्ट करण्या इतकेच किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त आवश्यक पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आहे, कारण शेवटी पर्यावरणाचा प्रश्न हा “कोणी तरी” सोडवायचा प्रश्न नाही; तो “आपण सर्वांनी” जगायचा प्रश्न आहे.




